पिंपरी (Pclive7.com):- प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नागरी सुविधा केंद्राकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची लुटमार सुरु आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते कै.दत्ताकाका साने यांचे चिरंजीव यश साने यांनी केली आहे.
यासंदर्भात यश साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर माई ढोरे यांना आज निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत सध्या रावेत, बो-हाडेवाडी, च-होली येथील सदनिकांसाठी इच्छुिक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण ३५०० सदनिकांच्या या योजनेसाठी दि.२८ सप्टेंबर पर्यंत कमीत कमी १ लाख पन्नास हजार अर्ज सादर झाले आहेत. यापुर्वी सन २०१७ मध्ये या योजनेच्या सर्व्हेक्षणाचे काम झाले आहे. त्यावेळी ही इच्छुक नागरिकांनी अर्ज सादर केले होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हजारो नागरिकांनी अर्ज केले होते.
सध्या महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांसाठी पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहेत. तथापि, सध्या महापालिका हद्दीतील नागरी सुविधा केंद्रावर तसेच काही सायबर कॅफेमध्ये अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सर्व्हेक्षणाच्या यादीत नाव असल्याची खात्री करण्यासाठी नागरिक स्वत:चा आधारकार्ड क्रमांक सांगतात. मात्र ज्यांनी यापुर्वीच्या सर्व्हेक्षणात सहभाग घेतला नव्हता त्या नागरिकांनाही डी.डी. आणि आधारकार्ड व अन्य कागदपत्रे सादर करण्याचे संदेश येत आहेत. या वरुन योजनेतील भोंगळ कारभार समोर येत आहे.
ज्यांनी २०१७ च्या सर्व्हेक्षणासाठी अर्जच केला नव्हता त्याचे नाव सर्वेक्षणात अर्ज सादर केला म्हणून कसे काय येऊ शकते असा प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. शिवाय कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नागरी सुविधा केंद्राकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची लुटमार सुरु आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी आहेत. त्या तात्काळ दुरुस्त कराव्यात आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी यश साने यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group