पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरात अनेक भटकी कुत्री दिवसभर वावरत असल्याने कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे नागरिकांना रस्ता बदलून जावे लागते, तर काहींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजकरण, लसीकरण आणि नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. फ क्षेत्रीय कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय ठिकाणीच भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट होत असल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित आरोग्य अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि आवश्यक असल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही सचिन काळभोर यांनी केली आहे.
दरम्यान, नागरिकांनीही भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.




















Join Our Whatsapp Group