पिंपरी (Pclive7.com):- पोलिसांवर गोळीबार करून उसाच्या शेतातून फरार झालेला आणि तब्बल ७० हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने रचलेल्या अचूक सापळ्यात आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेखर संभाजी जाधव असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेखर जाधव आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार करत खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते.
तपासादरम्यान शेखर जाधव आणि त्याचा साथीदार मुस्तफा उर्फ भाईजान हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिसांचा माग लागल्याचे लक्षात येताच आरोपींनी पुन्हा एकदा पोलीस पथकावर गोळीबार करत पलायन केले. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, १४ जून रोजी सायंकाळी शेखर जाधव हा दिघीतील मोझे शाळेसमोरील मोकळ्या मैदानात येणार असल्याची गोपनीय माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेखर जाधव याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ७० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याविरोधात दोन गोळीबाराचे गंभीर गुन्हेही नोंद आहेत. या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group