पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना आणि आंद्रा धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने शहरावर पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. पवना धरणातील पाणीसाठा केवळ २० टक्क्यांवर तर आंद्रा धरणातील साठा २९ टक्क्यांवर आला आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे धरणांमधील उपलब्ध पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत असून, पाटबंधारे विभागाने महापालिकेला १५ टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणीपुरवठा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, पुढील पंधरवड्यात पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या वॉशिंग सेंटर्सही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महापौरांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करताना स्पष्ट केले की, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
याशिवाय, ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे किंवा पाणीपुरवठा होणार नाही, त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. शहरातील पाणीसंकट अधिक तीव्र होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी बचतीत सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group