पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड फाटा परिसरातील दत्त मंदिर रस्त्यावर असलेल्या दिल्ली 6 बिर्याणी हॉटेलमध्ये भीषण आग लागून १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील गॅस सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक आगीचा आणि धुराचा मोठा भडका उडाला. काही क्षणांतच हॉटेलमध्ये धूर पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, हॉटेलमध्ये अडकलेल्या मोहम्मद सहजद (वय १९) या युवकाचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.

दरम्यान, सिलेंडर बसवण्यासाठी आलेला गॅस एजन्सीचा कर्मचारी घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, तसेच दुर्घटनेस नेमके कोण जबाबदार आहे याचा तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.




















Join Our Whatsapp Group