लायन समाधान आसबे अध्यक्ष, तर सुनील ढगे कोषाध्यक्षपदी
पिंपरी (Pclive7.com):- लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी (क्लब क्र. १३५४३३) च्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा चिंचवड येथील ZIP by Spree Hotels येथे शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी लायन समाधान आसबे यांनी अध्यक्षपदाची, लायन सौरभ कुलकर्णी यांनी सचिवपदाची, तर लायन सुनील ढगे यांनी कोषाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

या सोहळ्यास इन्स्टॉलिंग ऑफिसर लायन अशोक मिस्त्री (LCIP) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देऊन आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास एल.एम. गव्हर्नर दीपक लोया, क्लब ॲडमिनिस्ट्रेटर लायन दामाजी आसबे, माजी अध्यक्ष लायन अविनाश कुलकर्णी, नंदिनी आसबे, लायन विकास साखरे, ॲड. किरण पवार यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय क्लब ॲडमिनिस्ट्रेटर दामाजी आसबे यांनी केले.

नवनियुक्त अध्यक्ष लायन समाधान आसबे यांनी आपल्या मनोगतात आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रांवर विशेष भर देत वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, महिलांसाठी कर्करोग तपासणी, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि करिअर मार्गदर्शन यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, समाजसेवेचा एक भाग म्हणून क्लबच्या वतीने देहू येथील गरजू मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेला ११ हजार रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत व कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आर्या साखरे व सई शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लायन संभाजी लोखंडे यांनी केले. यावेळी ‘We Serve’ या ब्रीदवाक्यानुसार आगामी वर्षातही समाजहितासाठी विविध सेवा उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार क्लबच्या वतीने व्यक्त करण्यात आला.




















Join Our Whatsapp Group