मारुती जाधव यांचे सुनेत्रा पवार यांना निवेदन; तातडीने कारवाईची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी चौक ते घरकुल चेरीज स्वीट चौक दरम्यानच्या स्पाईन रोड व सर्व्हिस रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, संशयित अनधिकृत बांधकाम आणि झाडतोडीच्या तक्रारींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौक या मार्गावरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डॉल्फिन विस्टा सोसायटीलगत असलेले स्टार बाजार, मॅट्रिक्स क्लासेस, मौर्य फोर हॉटेल, सूर्य हॉस्पिटल तसेच कृष्णानगर पोलीस लाईनसमोरील बस पार्किंग यामुळे सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी वाढत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रस्ते आणि प्रवेशमार्गांमध्ये वाहने उभी राहत असल्याने नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करणे कठीण झाले आहे.

कुदळवाडी ब्रिजच्या मुख्य चौकापासून घरकुल मुख्य चौकापर्यंतचे अवघे ३०० मीटर अंतर पार करण्यासाठी अनेकदा अर्धा ते पाऊण तास लागत असल्याचे जाधव यांनी नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाया जात असून दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.
याशिवाय, सार्वजनिक फुटपाथवर उभारण्यात आलेल्या संशयित अनधिकृत जिन्याची पाहणी करून त्याची कायदेशीरता तपासावी, मंजूर नकाशा आणि परवानग्यांची पडताळणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. परिसरातील काही झाडांची परवानगीशिवाय छाटणी किंवा तोड करण्यात आल्याच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांना वेळेत पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे जाधव यांनी सांगितले.
या संदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच चिखली वाहतूक विभाग आणि चिखली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही स्वतंत्र निवेदने देण्यात आली आहेत. सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटविणे, आपत्कालीन मार्ग मोकळा ठेवणे, आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक उभारणे आणि नियमभंग् करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
याबाबत बोलताना मारुती जाधव म्हणाले, “कुदळवाडी ते घरकुल परिसरातील वाहतूक कोंडी ही केवळ गैरसोयीची बाब नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर समस्या आहे. प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांवर कारवाई करावी व नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा.”




















Join Our Whatsapp Group