पिंपळे सौदागर (Pclive7.com): पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन परिसरात वाढत असलेल्या गैरप्रकारांमुळे नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आणि सांगवी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत अनिता काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील लिनिअर गार्डन हे नागरिकांसाठी फिरणे, व्यायाम करणे आणि विरंगुळाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र अलीकडच्या काळात येथे काही व्यक्तींकडून मद्यपान, धूम्रपान, गोंधळ घालणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागत असून परिसरातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही युवकांकडून वाहनांमध्ये बसून मद्यपान व धूम्रपान केल्याच्या घटनाही घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरसेविका अनिता काटे यांनी प्रशासनाकडे या परिसरात नियमित पोलिस गस्त वाढविणे, सायंकाळच्या वेळी विशेष सुरक्षा व्यवस्था करणे, सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी व देखरेख मजबूत करणे तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय गंभीर असून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात,” अशी मागणी त्यांनी संबंधित विभागांना केली आहे. या निवेदनानंतर महापालिका प्रशासन आणि पोलिस विभाग कोणती पावले उचलतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group