पिंपरी (Pclive7.com):- प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, चिंचवड आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमासाठी मराठीचा स्टार अभिनेता सिध्दार्थ जाधव सोमवारी (३ ऑगस्ट) मोहननगर-काळभोरनगरला आला होता.

जवळपास दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात सिध्दार्थने विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरेही दिली. खुसखुशीत संवादशैलीमुळे सिध्दार्थने उपस्थितींची मने जिंकली. सिध्दार्थची प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित “ॲनिमल” या नाटकातील काही संवाद व प्रसंगांचे त्याने यावेळी सादरीकरण केले. आई, वडील आणि गुरुजनांकडून आपल्यावर वेळोवेळी चांगले संस्कार होत असतात. मात्र, काही लोकं मानवाचा जन्म मिळून देखील जनावरांप्रमाणे वागतात. चार वर्षाच्या बालिकेपासून ते वयोवृध्द महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना “माणूस” म्हणायचे का ? असा सवाल त्याने केला. याच ज्वलंत विषयावर “ॲनिमल” या नाटकात आत्मपरीक्षण करायला लावणारा आशय मांडण्यात आला आहे, असे सांगून हे नाटक सर्वांनी सहकुटुंब पाहिले पाहिजे, असे आवाहन सिध्दार्थने केले.
अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा, नक्कीच यश मिळेल, असा सल्ला सिध्दार्थने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला. जीवनात कधीही न्यूनगंड आणि अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी प्रयत्नशील रहा, धाडसी बना. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने आणि सकारात्मक विचाराने केल्यास नक्कीच यश मिळेल.

सिध्दार्थ म्हणाला की, मला माझ्या दिसण्याचा न्यूनगंड होता. स्वतःमध्ये आहे ते प्रथम स्वीकारावे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. मला माझा ‘आरसा’ देखील प्रेरणा देतो. आपल्याला स्वतःच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजे. कोणतीही कृती करताना सर्वस्व झोकून द्या व समर्पण भावनेने ते काम करा. ते तुमच्यासाठी सर्वोत्तमच असेल. जीवनात आपण नेहमी दुसऱ्यांच्या विचारांनुसार वागू लागतो, ते चुकीचे आहे. तुमचे आई-वडील हेच तुमचे ‘बेस्ट फ्रेंड’ आहेत. त्यांना कधी ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करू नका. त्यांच्याशी आदरयुक्त संवाद ठेवा. माझे आई-वडील हेच माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्र शासनाने मला व्यसनमुक्तीचा ‘ब्रँड अँबेसिडर’ केले, तेव्हा तो माझ्या आई-वडिलांचा व त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्काराचा सन्मान होता, असे मी मानतो.
सर्वच क्षेत्रात अपयश असते, परंतु ते कायमस्वरूपी नसते, त्यातून निराश व्हायचे नाही. दारू, सिगारेटसारख्या घातक व्यसनांपासून दूर राहायचे. नैराश्यात कधीही आत्महत्येचा विचार करायचा नाही, असे तो म्हणाला. रूप, सौंदर्य हे नश्वर आहे. आपल्या कर्तुत्वातून आपले वलय निर्माण करावे. मला ‘एफटीआयआय’ किंवा ललित कला केंद्रात प्रवेश मिळाला नाही. मला द्रोणाचार्य मिळाले नाहीत. मात्र, अनुभवाच्या, परिश्रमाच्या जोरावर मी एकलव्य होऊ शकलो, अशा भावना सिध्दार्थने व्यक्त केल्या.

रौप्यमहोत्सवी वर्षांत मागे वळून पाहताना….
चित्रपट क्षेत्रातील माझे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मागे वळून पाहताना उराशी बाळगलेली अनेक स्वप्नं पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे सिध्दार्थ म्हणाला.
माझे वडील बीएमसीमध्ये कामाला होते. मुंबईत घर घेणे म्हणजे दिवास्वप्नं होते. परंतू कष्टाने वयाच्या २६ व्या वर्षी ‘रामचंद्र जाधव’ यांच्या नावाची पाटी लावून नवीन घरात गृहप्रवेश केला. आता “तारा राम” या आईवडिलांच्या नावाने निर्मिती संस्था स्थापन करून “ॲनिमल” नाटक सुरू केले आहे आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, अमित भंडारी यांच्यासह इतर अनेक मित्रांचे, हितचिंतकांचे माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. दिग्दर्शकांनी माझ्याकडून उत्कृष्ट काम करून घेतले. प्रत्येकांकडून मला खूप शिकायला मिळाले, अशा भावना सिध्दार्थने यावेळी व्यक्त केल्या.
या वेळी प्रतिभा इन्स्टिट्यूटचे संस्थापक दीपक शहा, प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्यासह राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, नाना शिवले, संतोष बाबर, अविनाश ववले, नंदकुमार कांबळे, संतोष चांदेरे, गणेश लंगोटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी तर आभारप्रदर्शन सुरेखा कुंभार यांनी मानले.




















Join Our Whatsapp Group