पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात पाकिस्तान निर्मित ‘Goree Beauty Cream’ विक्रीसाठी ठेवणाऱ्या दुकानदारावर दहशतवाद विरोधी शाखेने (ATS) कारवाई केली आहे. भारतात विक्रीस परवानगी नसलेली आणि ‘Made in Pakistan’ अशी नोंद असलेली ही क्रीम पिंपरीतील पीएमपीएमएल बसथांब्याजवळील शक्ती कॉस्मेटिक्स या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तपासात आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी या क्रीमचे 23 नग जप्त केले. प्रत्येक क्रीमची किंमत 550 रुपये असून, एकूण 12 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दुकान चालक प्रकाश मनोहरलाल गुरु याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 318(4) तसेच कॉपीराइट कायद्यातील कलम 51 आणि 63 अंतर्गत कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारत-पाकिस्तान व्यापारावर विविध निर्बंध असताना पाकिस्तानमध्ये तयार झालेली ही क्रीम पिंपरीपर्यंत कशी पोहोचली? तिचा पुरवठादार कोण आहे? ती कोणत्या मार्गाने भारतात आणण्यात आली? यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का? अशा अनेक मुद्द्यांचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.

दहशतवाद विरोधी शाखेने नागरिकांना आवाहन केले असून, बाजारात ‘Made in Pakistan’ अशी नोंद असलेली कोणतीही वस्तू विक्रीस आढळल्यास तात्काळ पोलिस किंवा दहशतवाद विरोधी शाखेशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे.

















Join Our Whatsapp Group