पिंपरी (Pclive7.com):- अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी काही महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवरील प्रवेश (Entry) आणि निर्गमन (Exit) व्यवस्थेत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. भाविक आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा यासाठी स्थानकनिहाय विशेष नियोजन करण्यात आले आहे.

पुणे मेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीसीएमसी, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, एसएनडीटी, गरवारे कॉलेज आणि पीएमसी या स्थानकांवरील काही गेट केवळ प्रवेशासाठी तर काही गेट केवळ निर्गमनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकांवर पोहोचल्यानंतर सूचनाफलकांचे पालन करून संबंधित गेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, अनंत चतुर्दशीनिमित्त पुणे मेट्रोची सेवा सलग ४१ तास सुरू राहणार असून गणेश भक्तांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विसर्जन मिरवणुका आणि शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता मेट्रो हा सर्वात सोयीस्कर आणि जलद पर्याय ठरणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मोठी गर्दी होत असल्याने तेथे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. बॅरिकेडिंग हटविण्यात येईपर्यंत या स्थानकावरील प्रवासी व्यवस्थापन विशेष पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली.

हे सर्व बदल केवळ २५ सप्टेंबर रोजी लागू राहतील. २६ सप्टेंबरपासून संबंधित सर्व स्थानकांवरील प्रवेश व निर्गमन व्यवस्था पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा आणि मेट्रो प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group