पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. काळी फिल्म लावलेली वाहने, फॅन्सी व अनधिकृत नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट नसलेली वाहने तसेच मॉडिफाइड सायलेंसर लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

२२ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल ५ लाख ७२ हजार १८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ६३ कोटी ७८ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईच्या आकडेवारीनुसार, विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या ७२ हजार १२३ वाहनचालकांवर, फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ५३ हजार ८४० वाहनांवर, तर काळी फिल्म लावलेल्या २७ हजार ५९७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मॉडिफाइड सायलेंसर वापरणाऱ्या १० हजार २०३ वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, अधिकृत नंबर प्लेट लावाव्यात तसेच वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल टाळावेत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वाहतूक पोलीस कारवाईची ठळक आकडेवारी..
एकूण कारवाया: ५,७२,०१८
वसूल दंड: ₹६३,७८,४७,६५०
विनाहेल्मेट वाहनचालक: ७२,१२३
फॅन्सी नंबर प्लेट: ५३,८४०
काळी फिल्म (काचा): २७,५९७
मॉडिफाइड सायलेंसर: १०,२०३


















Join Our Whatsapp Group