पिंपरी (Pclive7.com):- शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीलाच खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुरुवारी सकाळपासून महापालिका भवनात पाणीपुरवठा खंडित झाल्याने प्रशासनाची मोठी गैरसोय झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून पालिका भवनात पाणी उपलब्ध नसल्याने कर्मचारी, अधिकारी तसेच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून महापालिकेला तातडीने खाजगी टँकर बोलावून पाणीपुरवठा करावा लागला. यासाठी तब्बल तीन खाजगी टँकरद्वारे पाणी आणण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

विशेष म्हणजे, शहरातील नागरिकांकडून वारंवार अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या जात असताना आता स्वतः महापालिका भवनालाच टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पालिका भवनात पाणीपुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे बंद झाला, याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे स्पष्ट उत्तर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेमागील कारणांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेच्या मुख्य इमारतीलाच टँकरने पाणीपुरवठा करावा लागणे ही शहराच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


















Join Our Whatsapp Group