पिंपरी (Pclive7.com):- उत्तर प्रदेश, हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. उपचारादरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झालेला आहे. या अमानवीय घटनेचा लढा यूथ मूव्हमेंट कडून जाहीर निषेधाचे निवेदन आज पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड कृष्णप्रकाश यांना देण्यात आले.
लढा यूथ मूव्हमेंट कडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की उत्तर प्रदेश मध्ये दलित अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. चित्रपटाला शोभेल अशा प्रकारच्या थरारक घटना सातत्याने त्याठिकाणी घडताहेत. यापूर्वी जमिनीच्या कारणावरून दोनशे ते अडीचशे सवर्ण समाजाच्या लोकांनी अंदाधुंद गोळीबार करून 20 दलितांना आदिवासींना ठार मारले होते, यातील आरोपींना अटक करण्या एवजी याचा निषेध नोंदवायला जाणाऱ्या प्रियंका गांधींनी देखील सरकारने अटक केले. दुसऱ्या घटनेत जातीय अत्याचाराचा प्रतिबंध केला म्हणून चंद्रशेखर आजाद उर्फ रावण याला रासुका अंतर्गत जेलमध्ये डांबले. नुकतेच अशाच एका जाती अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नितीन राऊत उत्तरप्रदेश या ठिकाणी गेले असता त्यांना देखील अटक करण्यात आले होते.
एकंदरीतच जातीय अत्याचाराच्या घटना घडवण्यासाठी जात्यांध धर्मांध वृत्तीच्या लोकांना रान मोकळी करून देणे आणि आणि अशा घटना घडल्यानंतर सुद्धा त्या आरोपींना अटक न करणे या सोबतच जे या घटनेचा निषेध नोंदवतील त्यांच्यावर मात्र अटकेची कारवाई करणे अशा चुकीच्या पद्धतीचा राज्य कारभार योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे हाथरस येथे जातीय हत्याकांडात व अत्याचारात बळी पडलेल्या मनीषा वाल्मिकी या भगिनीला मेणबत्ती पेटवत आदरांजली अर्पण करून उद्या निगडी आझाद चौक या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
सदर निवेदनावर लढा यूथ मूव्हमेंटचे प्रमुख प्रमोद क्षिरसागर, भैय्यासाहेब ठोकळ, मेघाताई आठवले, प्रबुद्ध कांबळे, अमित गोरे, पंकज धेंडे, भूषण अहिरे, संदीप माने, आप्पा कांबळे, सिद्धार्थ मोरे, समाधान कांबळे, राष्ट्रतेज सवई, राकेश माने, गौतम कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






















Join Our Whatsapp Group