पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धन कार्यातील अडथळे दूर व्हावेत व संवर्धन कार्याला गती मिळावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळांने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. संवर्धनाच्या कार्यातील अडथळ्यांविषयीचे निवेदन आणि प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने १२ वर्षापासून गड संवर्धनासाठी काम केले जात आहे. आता पर्यंत १ हजारापेक्षा जास्त मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. लोकवर्गणीतून १० किल्ल्यांवर ११ प्रवेशद्वार, २५ पेक्षा अधिक तोफांना गाडे बसविण्याचे कार्य करण्यात आले आहे. राजगडच्या पाली दरवाजाला सागवानी कवाड, जुन्नर येथील हडसर किल्ल्यावर प्रवेशद्वार लावण्यात येणार आहे. किल्ले संवर्धनाचे काम करताना अनेक प्रकारचे अडथळे येत असून ते सोडवण्यासाठी सहकार्य करावे यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात आली.
या शिष्टमंडळात सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर, गौरव शेवाळे, प्रकाश नायर, कैलास ओव्हळकर, देव वाळुंज, धीरज पेडेकर आदींचा समावेश होता.
राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्याकडे गडकिल्ले संवर्धनाबाबत पाठपुरावा आणि सतत पत्रव्यवहार केला जातो. संवर्धनाचे काम गतीने व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु या पत्रव्यवहारात विलंब होत असतो. केंद्रीय पुरातत्व विभागाकडून योग्य सहकार्य मिळत नाही. कामगारांना कामावरून कमी केले जात आहे.
संवर्धनाच्या कामासाठी परवानगी नाकारली जाते. मनमानी कारभार केला जात असल्याचेही शिष्टमंडळाने राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. पुरातत्व विभागाला हे प्रश्न सोडविण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.






















Join Our Whatsapp Group