लोणावळा (Pclive7.com):- कोरोनामुळे गेली सहा महिने बंद असलेले भुशी धरणासह इतर धरण परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी अखेर खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ७ जूनपासून पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाणे असलेले लोणावळ्यातील भुशी धरण, टायगर पॉइंटसह मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळ्यासह ग्रामीण भागातील ३१ पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील पर्यटनाचा गाडा बंद झाला होता. राज्य सरकारच्या वतीने मिशन बिगीन अगेन मोहिमेअंतर्गत लॉकडाउन हळूहळू शिथील करण्यात येत असल्याने पर्यटनावरील बंदी तत्काळ मागे घेत पर्यटन व पर्यटन उद्योगांवरील बंदी आदेश मागे घेण्याची मागणी करण्यात येत होती.
सरकारच्या वतीने हॉटेल्स, रिसॉर्टस खुले केले. मात्र, पर्यटन स्थळांवरील बंदी कायम होती. सरकारने प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केल्याने लोणावळा, खंडाळ्यात शनिवार व रविवारी पर्यटकांची तुडुंब गर्दी पहावयास मिळाली. काही पर्यटकांनी खासगी बंगले, रिसॉर्टमध्येच राहणे पसंत केले, तर काही निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेले पर्यटक पर्यटन स्थळे बंद असल्याने माघारी फिरले.
मावळातील पर्यटन बंदीमुळे लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले. ग्रामीण अर्थकारणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी ग्रामीण भागातील पर्यटनावर आधारीत उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू करावेत, मावळातील पर्यटनस्थळे खुली करावीत, अशी मागणी मावळ तालुक्यातील ग्रामीण व्यावसायिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आमदार सुनील शेळके यांनाही याबाबत निवेदन दिले होते. अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी मावळातील धरण परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्याचे आदेश दिले.
मावळ निसर्ग संपदेने समृद्ध आहे. येथील अर्थकारण मावळच्या ग्रामीण भागातील प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यावसायिकांना पर्यटन बंदी उठविल्याने दिलासा मिळेल असे मत व्यावसायिक व्यक्त करत आहेत.






















Join Our Whatsapp Group