पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात ‘खंडेनवमी’ कोरोनाच्य यऔद्योगिक नगरीत खंडेनवमी कोरोनाच्या सावटाखाली उत्साहात साजरी.
भोसरी येथील डायनोमर्क कंपनीमध्ये खंडेनवमी निमित्त सर्व कामगारांनी आपल्या मशीनरीची व सभोवतालच्या परीसराची स्वच्छता केली. प्रत्येक कामगाराने आपल्या मशीनची नारळ फोडून, हार घालून सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळुन विधिवत पूजा केली. सर्व कामगार व अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक किशोर राउत व संचालिका आमिता राउत यांनी प्रथम कंपनीच्या प्रवेशद्वाराची विधिवत पूजा केली.
कंपनीतील दत्त मंदिराला रंग देऊन आकर्षक विद्युत रोषणाई रवि भेंनकी यांनी केली. तर रंग देण्याचे काम एल्लापा पोंगुडवाला आणि रनजितसिंग यांनी केले.
यावेळी भक्तीगितांनी मंदिर व कंपनीतील परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. दत्ताच्या मंदिरासमोर सर्व कामगारांनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून ठराविक अंतर ठेवून सामुहिक आरती केली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक, किशोर राऊत यांनी सर्व कामगारांनी वर्षभर अपघात विरहीत केलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले. कोरोनाच्या महामारीमुळे जे आपले सर्वाचे नुकसान झाले, त्यासाठी सर्वांनी स्वतःची व आपल्या सहकारी कामगारांची काळजी घेऊन आपण एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या सहकाराच्या उक्ती प्रमाणे सर्वांनी एकोप्याने, हेवेदावे न करता जास्ती जास्त उत्पादन करण्याचे यावेळी आव्हान राउत यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांनी “दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा” असे म्हणत दसऱ्याच्या सणाचे, खंडोनवमीचे व या काळातील आदीशक्ती देवीचे महत्व कामगारांना सांगितले. आपण आपल्या यंत्रामुळे व कंपनीमुळे प्रपंच चालवतो. त्या कामाशी प्रामाणिक राहून स्वतः सुरक्षित राहून सुरक्षित काम केले पाहिजे असे मत आण्णा जोगदंड यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी संचालिका अमिता राउत म्हणाल्या की सध्या औद्योगिक क्षेत्रात खूप मंदी आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या कंपनीचे व आपलेही खूप नुकसान झाले आहे. प्रत्येकाने उत्पादन खर्चात काटकसर करुन उत्पादन वाढवण्याचे कामगारांना आव्हान केले.
दसऱ्यानिमित्त सर्व कामगारांना कंपनीच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले. कंपनीत काही उत्कृष्ट कामगारांचा सत्कार करण्यात आला.
काही कामगारांना कोरोना झाला होता. तेव्हा त्या कामगारांना दवाखान्यात दाखल करण्यापासून ते घरी सोडेपर्यंत त्यांना दवाखान्यात जाऊन मदत केली म्हणून गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार किशोर राऊत यांच्या उपस्थितीत विभाग प्रमुख ईधाते दिलीप व मनुष्यबळ विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वर्षभरात आधिक चांगले काम करणाऱ्या व कोरोना काळात सुरुवातीपासून येऊन अधिक उत्पादन करण्यात ४५ कामगारांनाही सन्मानीत करण्यात आले. सर्व कामगारांना आपट्याची पाने व आर्थिक मदत ही किशोर राउत यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी कामगार वेगवेगळ्या वेशभूषा करून कामावर आले होते.
मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम झाला. त्यांनी सर्व कामगारांना कोरोना आजार होऊ नये व झाल्यावर काय काळजी घ्यावी याची माहिती सर्व कामगारांना दिली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, संचालिका अमिता राउत, मनुष्यबळ विभाग प्रमुख सूर्यकांत मुळे, विभाग प्रमुख दिलीप ईधाते, हर्षल शेळके, मोहशकृष्णन, राजेश वैद्य, अकाऊंट विभाग प्रमुख प्रविण बाराथे, अक्षरा राऊत, विनायक शेरकर, केतकी राउत, बापुराव हगारे आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group