पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे कारभारी असलेले भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातील सत्ता संघर्ष आता पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहचला आहे. स्थायीत झालेल्या ‘त्या’ वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत किमान तात्पुर्ता ‘समेट’ घडला असून आज (दि.१६) होणारी स्थायीची सभा सुरळीत पार पडेल असा दावा भाजपातील गोठातून व्यक्त केला जात आहे.
वाकडच्या विकासकामांवरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे आमदार जगताप समर्थक सदस्यांनी केलेला तांडव सर्वश्रृत आहे. ‘त्या’ विषयावरून भाजपाच्या दोन आमदारांमधील सत्ता संघर्ष चव्हाट्यावर आला होता. आता हा वाद थेट भाजप प्रदेश पक्षश्रेष्ठींच्या दरबारी पोहचला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यातील वाद मिटवला असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा समेट घडवून आणला आहे. त्यामुळे किमान पुढील काही महिने तरी या कारभारी एकदिलाने काम करतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना टार्गेट करत अक्षरषः राडा घातला होता. त्याला प्रत्युत्तर देऊन विकासकामांचे निर्णय घेण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या गटाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांसोबत एकजूट केली. त्याची चीड आल्याने जगताप समर्थकांनी सभागृहात हाहाकार घालून सभापती संतोष लोंढे यांना सभा तहकूब करण्यास भाग पाडले होते. भाजपाला याचा भविष्यात फटका बसण्याचे संकेत मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रदेशच्या कोर्टात हा वाद मिटवण्यासाठी आणला होता.
पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचे आजही तीन गट सक्रिय असून त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. स्वतःला निष्ठावंत समजणा-या भाजप पदाधिका-यांचा गट सध्या कोणत्याच भूमिकेत नाही. त्यामुळे जगताप आणि लांडगे गटात वारंवार वाद होताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ‘हतबल’ झाल्यामुळे त्यांनी हा वाद देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात नेला. अखेर फडणवीस यांनी दोन्ही आमदारांमध्ये ‘समेट’ घडवून आणला आणि किमान पुढील काही दिवस तरी फडणवीस यांच्या शब्दामुळे दोन्ही आमदारांमध्ये कुठलाच वाद होणार नाही असाच दावा विश्वसनीय सूत्रांनी केला आहे.























Join Our Whatsapp Group