पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचा-यांवर वैद्यकीय उपचारासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना १ सप्टेंबर २०१५ पासून लागू करण्यात आली होती. ही योजना महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राबविण्यात आली होती. परंतु, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकारी व नेत्यांनी कर्मचा-यांसाठी विमा योजना राबविण्याचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, या योजनेला सुरुवातीपासून विरोध होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने या योजनेतील त्रृटी दाखवून देत विमा पॉलिसी न राबविण्याची मागणी केली आहे. विमा पॉलिसी राबवू नये, तसेच धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवण्यासाठी त्यांनी बुधवारी (दि.२०) रोजी लाक्षणिक उपोषण कर्मचारी वर्गाने केले.
धन्वंतरी स्वास्थ योजना तुर्तास बंद करण्यास औद्योगिक न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत. तसे असताना सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासनामार्फत विमा पॉलिसी अंमलात आणण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे.
या विमा पॉलिसीसाठी निधी देण्याकरिता एकूण २१ कोटी रुपयांचे तरतूद वर्गीकरण महापालिका सर्वसाधारण सभेत २० जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले. त्यासाठी पाणीपुरवठा विशेष योजना निधीतील तरतूद वळविण्यात आली आहे. शहरातील पाणीप्रश्नाचा विचार करता पाणीपुरवठा योजनांचा निधी पळविणे, ही बाब देखील शहराच्या दृष्टीने गैर आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागणी करून देखील बोलू न देता सत्ताधारी पक्षाने बहुमतावर हा प्रस्ताव मंजूर केला. तरी, याबाबत तातडीने विमा पॉलिसी लागू करण्याची कार्यवाही थांबवावी आणि धन्वंतरी स्वास्थ योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group