पिंपरी (Pclive7.com):- डेटिंग ॲपवर झालेल्या मैत्रिणीने तरुणाला गुंगीचे औषध पाजून लुटले. हा धक्कादायक प्रकार वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशिषकुमार बी (३०, रा. रेल नगर, कोयमबिडू, चेन्नई) यांनी शनिवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अनोळखी तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि फिर्यादी आशिषकुमार यांची ‘बंबल’ या डेटिंग ॲपवर मैत्री झाली. दरम्यान, तरुणीने तिला कामाची गरज भासवून आशिषकुमार यांना चेन्नई वरून पुण्याला भेटायला बोलावले.
आशिषकुमार यांनी भेटण्यास होकार दिल्यानंतर तरुणीने पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या सयाजी या तारांकित हॉटेलमध्ये रूम बुक केली. भेटी दरम्यान तरुणीने आशिषकुमार यांच्या कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध पाजून त्यांना बेशुद्ध केले.
त्यानंतर आशिषकुमार यांच्या अंगावरील ९० हजारांची सोन्याची चेन, २५ हजारांची सोन्याची अंगठी, २० हजारांचा मोबाईल आणि १५ हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख ५० हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group