पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील भीमसृष्टी शिल्पांमध्ये महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक मनुस्मृती दहनाचा प्रसंग उभारला नाही. तो प्रसंग लवकरच उभारावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड.लक्ष्मण रानवडे यांनी आज महापालिका आयुक्तांना दिला.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. या वेळी उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, महासचिव सचिन दाभाडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा स्मिता म्हसकर, पुणे जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे, माणिकताई शिंदे, शितलताई घरत, रत्नप्रभा खराडे, शाम पाटील, वाल्मिकी माने, राजेश सातपुते, वधू-वर कक्ष शहराध्यक्ष मोहन जगताप, शाखा अध्यक्ष रविंद्र इंगवले, ज्येष्ठ नागरिक कक्ष जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई उपस्थित होते.
यावेळी आयुक्त, महापौर व स्थायी समिती सभापती यांना भेटून दिलेल्या निवेदनात यांनी म्हटले आहे की, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महापालिकेने भीमसृष्टी हा प्रकल्प उभारला आहे. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंतच्या प्रसंगाचे शिल्प सदर ठिकाणी उभारले आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना म्हणून ज्याची इतिहासात नोंद आहे, तो प्रसंग मात्र जाणीवपूर्वक टाळल्याचे ही शिल्प पाहताना जाणवत आहे.
जातीयतेची व विषमतेची क्रांतीज्योत फडकवणारा मनुस्मृती दहनाचा प्रसंग या शिल्पांमध्ये नसल्याने बाबासाहेबांच्या सामाजिक व सांस्कृतिक लढयाची हि सुरुवातच खोडून टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला असल्याची यानिमित्ताने खात्री पटते आहे. समानतेची चौकट मोडणाऱ्या व शुद्र मनुष्याला प्राण्यांपेक्षाही क्रूर वागणूक देण्याचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे जाहिररित्या दहन करुन बाबासाहेबांनी समानता व सार्वभौम लोकशाहीची मांडणी संविधान लिहून पूर्ण करुन अखेर या व्यवस्थेला चपराक दिली आहे.
त्यामुळे ज्या ग्रंथातून मानवतेची थट्टा, चेष्टा व क्रूरता मांडली गेली तिचे दहन करणारा प्रसंग शिल्पाद्वारे महापालिकेने दाखवून तत्कालीन व्यवस्था कशी होते व बाबासाहेबांनी त्यास कसा सुरुंग लावला हे जनतेला व शहरवासियांना दाखविणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे.






















Join Our Whatsapp Group