पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे उद्भवलेल्या संकट आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडला. उद्योग-धंदे बंद पडले. व्यावसाय कोलमडले. त्यात असंख्य सर्वसामान्य, नोकरदारवर्गाच्या नोक-या केल्या. लोक बेरोजगार झाले. कोरोना संकटानंतर केंद्र सरकारकडून सादर होणा-या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पातून करदात्यांना आणि सर्वसामान्यांना काहीतरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सर्वांची होती. परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२१-२२ चा सादर केलेला अर्थसंकल्प पाहता देशवासायींचा अपेक्षाभंग करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे, अशी टीका पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका करताना संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, भाजप केंद्रीय अर्थसंकल्पाला आत्मनिर्भर बजेट म्हणत आहेत. प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था आणखी संकटात घेऊन जाणारा असल्याचे स्पष्ट होते.
अर्थंसंकल्पात मोठमोठी आकडेवारी पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. भाजपच्या केंद्रातील सरकारने पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याचे दिसते.
महागाई कमी करणे, रोजगार वाढविणे, उद्योगधंद्यांना चालना देणे आणि करदात्यांना दिलासा देणे यांसारख्या बाबींकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. देशवासीयांचा अपेक्षाभंग करणा-या भाजप सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. महागाईचा मारा सहन करणारे नागरिक भाजपच्या भुलथापांना आता बळी पडणार नाहीत, असे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group