पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता दिल्याबद्दल आणि अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजना, नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मांडण्यात आला होता. परंतू भाजपाने गलिच्छ राजकारण करत तो ठराव मंजूर होऊ दिला नाही असा आरोप विरोधी पक्षनेेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
यासंदर्भात बोलताना राजू मिसाळ म्हणाले की, सोमवार दिनांक ०८/०३/२०२१ रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे वित्तमंत्री व पुणे जिल्हाचे पालक मंत्री मा. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प जाहिर केला यामध्ये शहराच्या दिष्टीने पुणे – नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे कामास मान्यता, पुण्याबाहेरून अंदाजे २६ हजार कोटी रुपयांचा १७० किलोमीटर लांबीच्या चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, पिंपरी ते भक्ती शक्ती मेट्रो प्रकल्पास मान्यता व अंदाजपत्रात भरीव तरतूद इत्यादी कोट्यावधीची तरतूद शहराच्या नागरीकांच्या दृष्टीने केली आहे. यासह कोरोना विषाणू संसर्गांच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपरीषदा व नगरपंचायतीमधील दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी ५ वर्षात ५ हजार कोटींची भरीव तरतूद केली तसेच त्यापैकी या वर्षासाठी ८०० कोटी रुपये देणार आहेत.
प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड काऊन्सिलींग व ट्रिटमेंट सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या सर्व लोकहिताच्या योजना अर्थसंकल्पात मांडल्याबद्दल राष्ट्रवादी व शिवसेना पक्षामार्फत मंगळवारी झालेल्या माहे फेब्रुवारी महिन्याच्या मा. महापालिका सभेमध्ये मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजितदादा पवार तसेच महाविकास आघाडीचा अभिनंदनाचा ठराव माडण्यात आला होता. परंतु सत्ताधारी भाजपने त्याला विरोध दर्शविला अभिनंदन ठराव मंजुर केला नाही व आपला कोतेपणा दाखवून दिला.
मागील वर्षी ज्यावेळी कोरोनाचा कहर चालू होता, सगळे उद्योग धंदे बंद होते राज्याची परीस्थिती नाजूक होती त्यावेळी राज्यशासनाने अंदाजपत्रकाच्या फक्त ३३ टक्के खर्च करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याच काळात राज्याचे वित्तमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजितदादा यांनी कोणतेही पक्षीय राजकारण न करता भाजपची सत्ता असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सुमारे १८०० कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली होती.
यापूर्वी तत्कालिन सभागृहनेते एकनाथ पवार केंद्रात एकादा निर्णय झाल्यास उदा. जम्मू काश्मिर मधिल ३७० कलम हटविणेबाबत कायदा समंत केला तेव्हा त्यांनी मा. महापालिका सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता त्यावेळी आम्ही मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन केले होते. आम्ही यात कुठलेही राजकारण केले नाही. जी चांगली गोष्ट झाली तिला आम्ही पाठींबा दिला यात पक्षीय राजकारण केले नाही. परंतु भाजपचे पदाधिकारी आणि एकनाथ पवार यांनी कालच्या महाविकास आघाडीच्या अभिनंदनाच्या ठरावाला विरोध करुन पक्षीय राजकारण केले. तसेच राजकीय अपरीपक्वता दाखवून दिली असा आरोप राजू मिसाळ यांनी केला.





















Join Our Whatsapp Group