भोसरी (Pclive7.com):- जैन गुरु आचार्य भगवंत श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्त भोसरी येथील आनंद युवा मंच व गौतमनिधि फौंडेशन यांनी अन्नदानाचा उपक्रम राबवला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व ज्यांना या परिस्थितीमध्ये अन्नधान्याची अत्यंत निकड आहे अशा जवळपासच्या परिसरातील अनाथालय, वृद्धाश्रम, गरजुंना हे अन्नधान्य वितरित करण्यात आले.
श्री जैन संघ भोसरीच्या तत्वावधानामध्ये हा उपक्रम राबवताना डिजीटल मिडियाद्वारे या अन्नदानाबद्दल आवाहन करण्यात आले होते. व त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. भोसरी श्री जैन संघाचे सदस्य, चिंचवड, निगडी, औंध, येरवडा, पिंपरी मधील जैन बांधवांनी ही यात सहभाग घेत दान स्वरुपात धान्य सामग्री दिली.
दापोडी येथील सरस्वती अनाथालय, देहुगांव येथील वात्सल्य अनाथालय, कामशेत येथील किनारा वृद्धाश्रम, दौंड येथील अविश्री बाल सदन, आळंदी येथील भागवत सेवा समिती, व भोसरी मधील उर्जा प्रतिष्ठान यांना ही सामग्री वितरित करण्यात आली.
सामाजिक बांधिलकीची जान ठेऊन आनंद युवा मंच व गौतमनिधी फौंडेशन ही दरवर्षी भगवान महावीर जन्म कल्याणक दिवशी रक्तदान,व इतर वेळी संतसेवा वगैरे सारखे उपक्रम राबविते. अन्नदान हा या वर्षीचा पहिला उपक्रम होता. या वर्षीही 25 एप्रिल 2021रोजी भ. महावीर जन्मकल्याणक च्या दिवशी रक्तदानाचा संकल्प केला आहे.
यावेळी आनंद युवा मंच व गौतमनिधी फौंडेशनच्या सर्व सहकार्यांनी उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांची कृतज्ञता व आभार मानले.






















Join Our Whatsapp Group