पिंपरी (Pclive7.com):-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील नवीन सर्किट हाऊस येथे घेण्यात आली आहे. या बैठकीसाठी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पुढाकार घेतला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, वैशाली काळभोर, संजय वाबळे, पंकज भालेकर, श्याम लांडे, मोरेश्वर भोंडवे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसची रणनीती आखली आहे. तसेच महापालिकेत चाललेला भ्रष्टाचार, पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन, इतर पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश, प्रभाग रचना कशी असावी, पक्षसंघटनेत कोणकोणते बदल अपेक्षित आहेत अशा अनेक कामांचा आढावा खुद्द अजितदादा पवार यांनी घेतला असल्याने ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, अध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह पदाधिकाऱ्यांना कोणता बूस्टर डोस देणार याची चर्चा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.