पिंपरी (Pclive7.com):- धनगर समाजाचे दैवत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा चुकीच्या पद्धतीने नामोल्लेख कलर्स मराठी वाहिनीवरील एका कार्यक्रमात मराठी अभिनेते अतुल परचुरे यांनी केला आहे. याप्रकरणी अभिनेते अतुल परचुरे आणि कलर्स मराठी वाहिनीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन एल्गार सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने पिंपरी पोलिस स्टेशन येथे देण्यात आले.
एल्गार सेना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष राजू दुर्गे यांनी याबाबत पिंपरी पोलीसांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अतुल परचुरे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामांकित अभिनेते असुन सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ‘होळकरीन बाई’ असा नामोल्लेख केला आहे. ही बाब धनगर समाजाच्या भावना भडकवणारी आणि समाजाला अत्यंत मनस्ताप देणारी अशीच आहे. धनगर समाज यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावला गेला आहे. या जाणीवपूर्वक केलेल्या चुकीबद्दल अभिनेते अतुल परचुरे आणि मराठी कलर्स वाहिनी या दोघांवर गुन्हा दाखल होणे अत्यंत आवश्यक आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धनगर समाजाचे दैवत पुजनीय व्यक्तिमत्त्व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा असा एकेरी, विडंबनात्मक उल्लेख करणे कदापी सहन करणार नाही. कोरोना संकटाच्या काळात आम्ही शासनाला अडचणीत आणू इच्छित नाही. परंतु त्यासाठी अभिनेते अतुल परचुरे आणि कलर्स वाहिनी या दोघांनाही धनगर समाजाची जाहीर रित्या माफी मागितली पाहिजे.
ही आमची मागणी त्यांच्या पर्यंत पोहचवली गेली पाहिजे. आणि ७ दिवसांच्या आत या दोघांनीही माफी नाही मागितली तर पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये या दोघांवरही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या, भारताचा अभिमान, स्वाभिमान असणाऱ्या पुण्यश्लोक मातेचा अपमान केल्याबद्दल अदखलपात्र असा गुन्हा दाखल करावा. असे निवेदन एल्गार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने पिंपरी पोलिसांना देण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group