पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलीस बांधव या कोरोनाच्या महामारीत ‘फ्रंटलाईन वर्कर’ची महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. जनतेच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे आरोग्यही महत्वाचे आहे. शहरातील पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांना या लसीकरण मोहिमेत प्राधान्य द्यावे. तातडीने त्याबाबतचे आदेश द्यावेत अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
तुषार हिंगे यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून अनेकांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवेत काम करत असताना पोलीस कर्मचारी यांना देखील त्याचा फटका बसत आहे.
सद्यस्थितीत पोलीस बांधव दिवस-रात्र बंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यांच्यासह त्यांच्या परिवाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून पोलिसांचे परिवार सुरक्षित असल्याने पोलीस बांधवांना अधिक बळ येईल. याकरिता आपण यात तात्काळ लक्ष घालून पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेकरिता तात्काळ लसीकरणास प्राधान्य द्यावे अशी मागणी तुषार हिंगे यांनी केली आहे.