पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लवकरच पिंपरी-चिंचवड शहरात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाजाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे तातडीची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला शहरातील मराठा समाजाचे पदाधिकारी, समन्वयक, युवक कार्यकर्ते तसेच महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचे नियोजन, स्वागताची रूपरेषा, मार्ग निश्चिती तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, शुक्रवार (दि. १८ सप्टेंबर) रोजी दुपारी ३ वाजता वाकड येथील भुजबळ चौक, हिंजवडी उड्डाणपुलाखाली, पुणे-बेंगळुरू महामार्गावर मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. हा स्वागत सोहळा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी वक्त्यांनी मराठा समाजाची एकजूट, शिस्त आणि शांततेची परंपरा जपत हा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच दौऱ्याची माहिती शहरातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया, पत्रके आणि विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीला पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सकल मराठा समाजाचे आजी-माजी पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्वागत सोहळ्याची तयारी वेगाने सुरू आहे.


















Join Our Whatsapp Group