पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग कल्याण, सार्वजनिक वाहतूक, महिला सुविधा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नवी सांगवी परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच जलनिःसारण विभागामार्फत नलिकांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देखभाल व दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील मिळाला.
मोरवाडी येथील सुमारे २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या दिव्यांग भवनात विविध प्रकारच्या दिव्यांग नागरिकांसाठी थेरपी, समुपदेशन, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कौशल्य विकास व व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, ऑडिटोरियम आणि ग्रंथालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या भवनाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाच्या रचनेलाही मान्यता देण्यात आली. मौजे वाकड येथे पीएमपीएमएल बस डेपो व कार्यालयीन इमारत विकसित करणे तसेच इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी व वीजपुरवठ्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २५, वाकड येथे कार्यरत महिलांसाठी वसतिगृह उभारण्याच्या कामासाठी आर्थिक तरतुदींमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिला बचत गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘झिरो वेस्ट’ प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली. याशिवाय काळेवाडी आणि चिंचवड परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे, प्रभाग क्रमांक ११ मधील मंडप व्यवस्था, प्राथमिक शाळांमधील सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्ती यांसाठीच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
महापालिका हद्दीतील दिव्यांग नागरिकांना मोफत बस पास देणे तसेच ६० वर्षांवरील अंध व्यक्तींच्या सोबतीदारांना प्रवास पास उपलब्ध करून देण्याच्या योजनेअंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली. चऱ्होली येथील नव्याने विकसित रस्त्यांवर स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी नवीन वीजमीटर घेण्यास आणि वीजपुरवठा सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली.
याशिवाय महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालये, डॉग व्हॅन, डॉग पार्क आणि ॲम्ब्युलन्स सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी एजन्सी नियुक्ती, निवडणूक व प्रशासकीय कामांसाठी झेरॉक्स दरकरार, सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांच्या निकाली काढण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती तसेच शाळांमध्ये प्रयोगशाळा, वाचनालय, जिम उपकरणे आणि रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी संदेश, घोषवाक्ये आणि बोलकी चित्रे रंगविण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
यावेळी बोलताना स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असून मंजूर झालेल्या विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती लोकाभिमुख निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


















Join Our Whatsapp Group