पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८, रहाटणी – पिंपळे सौदागर या प्रभागात पावसाळ्यात चालू असलेले रस्ते खोदाईचे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८, रहाटणी – पिंपळे सौदागर या प्रभागात महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामासाठी महापालिकेने नेमलेल्या बी.जी. शिर्के कंपनी या ठेकेदरामार्फत विविध कामासाठी रस्ता खोदाईच्या कामाला सुरुवात केलेली आहे.
पिंपळे सौदागरमध्ये संपूर्ण रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत. खोदलेल्या रस्त्यांचे काम देखील संथ गतीने सुरु असून सर्व रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. सध्या पावसाळा चालू झाला आहे. पाऊस झाला की खोदकामामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार होते. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी, व चालताना नाहक त्रास होते आहे.
तरी ही बाब विचारात घेता पावसाळा चालू झाला असून महानगरपालिका नियमाप्रमाणे जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये कसल्याही प्रकारचे खोदकाम करता येत नाही. तरी स्मार्ट सिटीने नेमलेल्या बी.जी. शिर्के कंपनी यांनी सीवर लाईन, किंवा अन्य कारणास्तव पिंपळे सौदागर मधील उर्वरित राहिलेले रस्ते खोदाईचे काम देखील चालू केले आहे. ही कामे त्वरित थांबवावे व अपूर्ण अवस्थेत असलेल्या उर्वरित रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कराव्यात.
तसेच महानगरपालिका नियमाप्रमाणे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यात कसल्याही प्रकारच्या रस्ते खोदाईच्या कामास परवानगी देवू नये असे नाना काटे यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group