पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मात्र, अद्याप काही फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन न घेतल्याचं समोर आलं आहे. आता अशा कर्मचाऱ्यांची पगार थकीत करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड आयुक्तांनी घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे समोर आलं आहे.
लोका सांगे ब्रम्हज्ञान.. सारखा हा धक्कादायक प्रकार आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास येताच कठोर निर्णय घेतला आहे. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या आधिकाऱ्यांचा जुलै महिन्यातील पगार रोखण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. आयुक्तांनी यासाठी २० जुलैची डेडलाइन दिली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेसह मानधनावरील अधिकारी व कर्मचारी आणि ठेकेदारांच्याही कामगारांना २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घेण्यास बजावण्यात आलं आहे. अन्यता जुलै महिन्याचा पगार रोखला जाईल असा इशारा राजेश पाटील यांनी दिला आहे. मागील तीन महिन्यात दोनवेळा याबाबतचा लेखी आदेश दिल्यानंतरही कर्मचारी आणि आधिकाऱ्यांनी अद्याप लस घेतली नसल्याचं समोर आलं आहे, यानंतर राजेश पाटील यांनी कडक पाऊल उचललं आहे.
३१ मार्च रोजी लसीकरण करुन घ्यावं, असा पहिला आदेश राजेश पाटील यांनी दिला होता. त्यानंतर सहा मे रोजी दुसरा आदेश काढला होता. मात्र, त्यानंतरही बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही. कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी कठोर निर्णय घेतला आहे.
आपापल्या खात्यात लसीकरण करुन घेण्याची जबाबदारी सबंधित विभागप्रमुखांवर आयुक्तांनी टाकली आहे. स्टाफसह मानधनावरील आणि कंत्राटी कामगारांचेही (ठेकेदारांकडील) लसीकरण २० जुलैपर्यंत झाले नाही, तर त्यांचा पगार स्थगित ठेवण्याचा मानस आयुक्तांनी बोलून दाखवला आहे.