पुणे (Pclive7.com):- गेल्या तीन दिवसांपासून कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारपासून पुढील चार दिवस कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र व त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, बंगालच्या उपसागरापर्यंत असलेल्या हवेचा कमी दाबाचा पट्टा आदी कारणांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यानुसार बुधवारी कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, धुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तसेच विदर्भ व मराठवाड्यात यलों अर्लट (विजांसह पाऊस) असा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोसमी वाऱ्यांनी देश व्यापला..
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला असल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मोसमी वारे ८ जुलै रोजी देश व्यापतात. यंदा त्यास विलंब झाला.
२४ तासांतील पाऊस
गेल्या २४ तासांत पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात दोन मिलिमीटर, महाबळेश्वर ३८ मि.मी., तर सांगली आणि सोलापुरात प्रत्येकी एक मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबईत ३३ मि.मी., अलिबाग नऊ मि.मी., रत्नागिरीत ३७ मि.मी. आणि डहाणूला ५१ मि.मी. पाऊस झाला. विदर्भात सर्वाधिक बुलढाण्यात १३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.























Join Our Whatsapp Group