पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर चौकाजवळ असलेल्या 8 टू 80 गार्डन परिसरातील अंडरपासमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक फाटा ते हिंजवडी बीआरटीएस मार्गावर विकसित करण्यात आलेल्या या अंडरपासमध्ये स्वतंत्र बीआरटीएस मार्गिका असून, अत्यावश्यक सेवांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेशास मनाई आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून अनेक खासगी वाहने या मार्गिकेतून प्रवास करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या ठिकाणी बीआरटीएस मार्गिकेत तीव्र वळण (शार्प टर्न) तसेच अपुरा प्रकाश असल्याने आजपर्यंत अनेक गंभीर अपघात घडले आहेत. काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मागील आठवड्यातच येथे तीन अपघात झाले असून, त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. आयान अयाज शेख (वय 21) या तरुणाचाही या अपघातात मृत्यू झाला असल्याचे काटे यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर अंडरपास परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, पुरेशा प्रकाशव्यवस्थेची सोय करणे, इशारा फलक व वेग नियंत्रण यंत्रणा बसविणे तसेच बीआरटीएस मार्गिकेत खासगी वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नाना काटे यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group