पिंपरी (Pclive7.com):- औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश यांच्यासह पाच जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्काअंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई केली आहे.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या बाबतची माहिती पत्रकारांना दिली. गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६), नानासाहेब शंकर गायकवाड (वय ६०, दोघेही रा. औंध, पुणे), गणेश ज्ञानेश्वर साठे (वय ३५, रा. पिंपळे निलख) दीपक गवारे (रा. शिवाजीनगर, पुणे) आणि राजू दादा अंकुश (रा. पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत.
गणेश गायकवाड हा टोळीप्रमुख आहे. दंगा करून खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणीसाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे असे गुन्हे हिंजवडी, सांगवी, चतुःशृंगी, पौड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. या गुन्हेगारी टोळीद्वारे वर्चस्व तसेच आर्थिक फायद्यासाठी हिंसाचारही केल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर, त्यांच्याविरोधात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केल्याचे पोकळे यांनी सांगितले.