पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपा मधील धुसफूस प्रचंड वाढत चालली असून अनेक नगरसेवक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. शहरात भाजपा ज्यांनी रुजवली त्या दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे सख्खे पुतणे आणि भोसरीमधून बिनविरोध विजयी झालेले नगरसेवक रवि लांडगे यांना वारंवार डावलल्यामुळे त्यांनी थेट पक्षाच्या विरोधात पवित्रा घेतला आहे. आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी परिसरात “आता वेळ बदलणार” या टॅगलाईनचे शुभेच्छांचे होर्डिंग झळकू लागले आहेत. त्यात थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लागल्याने लवकरच रवि लांडगे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपा आपली सत्ता राखण्यासाठी दंड थोपटून मैदानात उभे आहेत. तर पुन्हा सत्ता खेचून आणायची म्हणून राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाने शहरात बैठका, संपर्क अभियान सुरू केले आहे. दुसरीकडे रवि लांडगे यांच्या सारख्या निष्ठावंत गटातील नगरसवेकाची उघड नाराजी भाजपासाठी मारक असल्याचे राजकीय विश्लषक सांगतात. रवि लांडगे यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलण्यात आले आणि भोसरीचे आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक म्हणून नितीन लांडगे यांना संधी दिल्याने धुसफूस वाढत गेली. रवि लांडगे यांनी आपली नाराजी दर्शविण्यासाठी स्थायी समिती बैठकांना अनुपस्थिती लावली. सलग दोन महिने अनुपस्थित राहिल्याने कायद्यानुसार त्यांचे समिती सदस्यत्व रद्द झाले असून त्या जागेवर अन्य सदस्याला संधी देण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. संघटना म्हणून सत्ताधारी भाजपासाठी एकप्रकारे ही नाचक्की असल्याचे सांगण्यात आले.
नगरसेवक रवि लांडगे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त करून एक मोहिमच उघडली असून त्यात भाजपा विरोधाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थनाचा सूर दिसून येतो. रवि लांडगे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना,“भोसरीचे विधानसभेचे नेतृत्व, भावी आमदार“, असा उल्लेख करून विद्यामान आमदार महेश लांडगे यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभेचे युवक अध्यक्ष अमित लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहर भाजपा कार्यालयाजवळील एका चौकात भले मोठे होर्डींग लावले असून त्यावर, रवि लांडगे, पार्थ पवार यांच्या फोटोसह,“आता वेळ बदलणार…“, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडींबद्दल नगरसेवक रवि लांडगे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, माझ्या वाढदिवसा निमित्त समर्थकांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यात वावगे काहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार वगैरे असे मी कुठेही म्हटलेले नाही, पण वेळ आल्यावर पत्रकारपरिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.






















Join Our Whatsapp Group