पिंपरी (Pclive7.com):- वाकड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात कारवाई करत सुमारे २ लाख ८ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास वाकड येथील कॅस्पटे वस्ती रोड परिसरातील एका चाळीतील खोली क्र.२ मध्ये ही कारवाई करण्यात आली. आरोपी किरणसिंग मोहनसिंग सोळंकी (वय ३२, रा. आण्णाभाऊ साठे नगर, वाकड, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानदेव मुरलीधर झेंडे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीकडे शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. आरोग्यास अपायकारक असलेल्या या पदार्थांची विक्री करताना आरोपी रंगेहाथ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३, तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group