पिंपरी (Pclive7.com):- चिखली, कुदळवाडीत महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत मशीद, मंदिरांसह एकूण ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. कारवाई दरम्यान परिसरात जमावाकडून दगडफेक झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची तसेच काही ठिकाणी दगडफेक झाली आहे. या घटनेचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे बोलले जात असले, तरी प्रशासनाकडून याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी कोणताही मोठा संघर्ष झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत संपूर्ण मोहीम शांततेत पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. महापौर लांडगे यांनी सांगितले की, शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असून, विविध धार्मिक स्थळांसह इतर बेकायदा बांधकामांवरही नियमानुसार कारवाई केली जाईल. तसेच अतिक्रमण, अवैध धंदे आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात महापालिका कठोर भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याआधीही महापालिकेने शहरातील अवैध दारूअड्ड्यांवर कारवाई करत मोठे अतिक्रमण हटविले होते. अशा सर्व बेकायदा प्रकारांवर भविष्यातही हातोडा चालविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने संकेत दिले आहेत.




















Join Our Whatsapp Group