महापालिकेने स्वतःची आधुनिक सीबीएसई माध्यमिक शाळा सुरू करावी; नगरसेविका रेश्मा भुजबळ यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे परिसरातील माध्यमिक शाळेसाठी राखीव असलेली महापालिकेची जागा खासगी संस्थेला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला विरोध करत नगरसेविका रेश्मा चेतन भुजबळ यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. सदर जागेवर खासगी संस्था उभारण्याऐवजी महापालिकेने स्वतःची आधुनिक सीबीएसई माध्यमिक शाळा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनानुसार, पुनावळे येथील सर्व्हे क्रमांक ३८/४४, आरक्षण क्रमांक ४/५७ ही जागा माध्यमिक शाळेसाठी राखीव आहे. या जागेसाठी एका खासगी संस्थेकडून ३० वर्षांच्या भाडेकरारासाठी अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुनावळे आणि परिसर हा वेगाने विकसित होणारा निवासी भाग असून उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधांची नागरिकांकडून मोठी मागणी आहे.

रेश्मा भुजबळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुनावळे परिसरात सध्या उपलब्ध असलेल्या प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे अपुऱ्या पडत आहेत. तसेच परिसरात महापालिकेची माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना अन्य भागात जावे लागते. त्यामुळे नागरिकांची दीर्घकाळापासून सीबीएसई अभ्यासक्रमाच्या महापालिका शाळेची मागणी आहे. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेता, राखीव जागा खासगी संस्थेला देण्याऐवजी त्या ठिकाणी महापालिकेने आधुनिक, सुसज्ज आणि दर्जेदार माध्यमिक शाळा सुरू करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
तसेच सुरू असलेली भाडेकरार प्रक्रिया तात्काळ रद्द करून या जागेवर सीबीएसई शाळा उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. या मागणीमुळे पुनावळे परिसरातील शिक्षण सुविधांबाबतचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून महापालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group