पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवारी पहाटे चिखली-कुदळवाडी परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. मात्र, या कारवाई दरम्यान एकाच समाजाशी संबंधित पाच धार्मिक स्थळे पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईपूर्वी स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निवेदन सादर करून अतिक्रमण हटविताना पारदर्शकता राखावी तसेच कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. तथापि, निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही तासांत पहाटेच्या सुमारास कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील सर्व अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई होणे अपेक्षित असताना निवडक बांधकामांवरच हातोडा चालविण्यात आला. त्यामुळे संबंधित कारवाईबाबत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

याप्रकरणी नागरिकांनी पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याचा इशारा दिला असून, सर्व अतिक्रमणांवर एकसमान धोरण राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
दरम्यान, विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असला तरी या आरोपांबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या कारवाई मागील नेमकी कारणे आणि प्रशासनाची बाजू स्पष्ट होणे अपेक्षित आहे.




















Join Our Whatsapp Group