पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार आढळराव पाटील यांच्यातील राजकीय संबंध सर्व परिचित आहेत. नुकताच त्यांचा एक वाद चांगलाच रंगला होता. स्थानिक राजकारणावरून त्यांनी एकमेकांवर टीका केली होती. एकमेकांचे उणेदुणे देखील काढले होते. परंतु, बैलगाडा शर्यती संदर्भात आम्ही एक आहोत अशा आशयाचा संदेश देण्याचा प्रयत्न खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
खासदार कोल्हे यांनी स्वतः माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना फोन करून बैलगाडा शर्यती संदर्भातील बैठक घेत असल्याचं सांगितलं. तर, बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं आढळराव यांनी कोल्हे यांना सांगितलं आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना फोन केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे यात कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड येता कामा नये. सर्वांनाच बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवायचा अशी भूमिका घेत आज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतः कॉल करुन बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी नव्याने रणनिती आखण्यासाठीच्या आजच्या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली.
बैलगाडा शर्यत बंदी विरोधात सर्वांची एकजूट दिसली पाहिजे. त्यामुळे सर्वच पक्षातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी यांची वज्रमूठ बांधून हा लढा द्यायचा हा मनोदय आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला सारून आवर्जून शिवाजीदादांना कॉल करून आपलंही मार्गदर्शन व्हावं अशी विनंती केली.
पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपली वेळ घेऊन आपल्याकडे चर्चेसाठी येतो मी असे सांगितले. बैलगाडा शर्यती हा आपल्या दृष्टीने कुठल्याही श्रेयवादाचा विषय नसल्याने आपण पक्षभेद न बाळगता सामूहिक प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.






















Join Our Whatsapp Group