पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील काही खाजगी शाळांचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गैरकारभार सुरू आहे व शासकीय नियंमांची पायमल्ली केली जात असल्याने अनेक पालकांना याचा त्रास होत आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते शासकीय स्तरावर तक्रार करून पाठपुरावा करत आहे.
याबाबत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे व नॅशनल स्टूडंस युनियन ॲाफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाकडे याबाबत पुराव्यासहीत लेखी तक्रारी केल्या आहेत.
याबाबत शिक्षण मंडळाने प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पत्रव्यवहारास व मागविलेल्या माहितीस न जुमानता शाळांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. याबाबत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या आंदेलनाच्या तयारीत आहेत.
शहरातील अमृता विद्यालय, कमल नयन बजाज स्कूल, सेंट ॲन्ड्रूस स्कूल, आचार्य आनंद ऋषी स्कूल, एस एन बी पी स्कूल (रहाटणी, चिखली, मोरवाडी आणि मोशी शाखा) या शाळांविरोधात तक्रारी दिल्या गेल्या असल्याचे समजते.
तक्रारीमध्ये प्रामुख्याने नियमबाह्य पध्दतीची प्रवेश प्रक्रिया राबविणे, प्रवेशासाठी अतिरिक्त पैसे घेणे, शासन नियमांना डावलून वारंवार फी साठी त्रास देणे न दिल्यास ॲानलाईन शिक्षण बंद करणे, शिक्षण हक्क कायद्यातील शालेय नियमावलीचे पालन न करणे, नियमबाह्य कारभार करणे, मुख्याध्यापक नेमणूक निकषांचे उल्लंघन, अल्प संख्याक दर्जा प्राप्त असताना निसमावली न पाळणे, पालकांशी गैर वर्तन करणे तसेच प्रशासकीय बाबींचे पालन न करणे, वेळेत माहीती न पुरवणे या तक्रारींचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वारंवार शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत व एकाच कारणासाठी वारंवार वेगवेगळ्या नोटीसा काढून वेळ काढू पणा केला जात आहे. प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही.
काही शाळांना राजकीय आश्रय व पाठबळ असल्याने तसेच धनदांडग्याचे अभय असल्याने शासकीय अधिका-यांवर दबाव असल्याचे नाव न सांगण्याच्या अटी वर एका शासकीय अधिका-याने कारवाई करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले.
सद्य स्थितीत केवळ अमृता विद्यालयाचा निगडी मान्यता रद्दचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे शिक्षण मंडळाकडून समजते. अन्य शाळांच्या बाबतीत शिक्षण विभागाच्या वरिष्ठांचे आदेश असूनही अजून कारवाई केली गेली नाही.
लवकरच या व ईतर ही शाळांच्या विरोधात मोठे आंदोलन करून पालकांना व नागरिकांना वेठीस धरून शासन नियमांची पायमल्ली करणा-या शहरातील शाळांविरोधात तीव्र भुमिका घेणार असल्याचे बनसोडे व खंदारे यांनी सांगितले.
शहरातील ज्या कोणी नागरिकांवर पालकांवर शाळांकडून आशाप्रमाणे शासन नियमांना डावलून सक्तीने फी वसुली, प्रवेश नाकारणे, योग्य वर्तवणूक न देणे व अधिक पैसे मागणे, अशा प्रकारचा अन्याय व पिळवणूक झाली असल्यास युवक काँग्रेस किंवा एन एस यु आय या काँग्रेस संघटनांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group