पिंपरी (Pclive7.com):- १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयाच्या ऐतिहासिक कामगिरीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. सैन्याच्या शौर्याला मानवंदना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने ‘स्वर्णिम मशाली’चे भ्रमण संपूर्ण भारतभर होत आहे. रविवारी (दि.०३) या मशालीला पिंपळे सौदागर येथील रोझ लॅन्ड रेसिडेन्सी येथे आणण्यात आले. नागरिकांनी पुष्पवृष्टी करत मशालीला मानवंदना दिली.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी व विद्यमान अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रोझ लॅन्ड रेसिडेन्सीच्या आवारात देशभक्तीमय वातावरण पहायला मिळाले. कार्यक्रमात देशभक्तीपर गीते आणि कविता सादर करण्यात आल्या.
मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठा होता. यावेळी हातात भारतीय तिरंगा घेऊन ‘भारत माता जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. रेसिडेन्सीच्या वेगवेगळ्या विंग मधून मशाल फिरवण्यात आली त्यावेळी नागरिकांनी मशालीवर पुष्पवृष्टी केली.
२०२१ हे वर्ष बांगलादेश निर्मिती युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ५० वे वर्ष आहे. भारतीय सशस्त्र दलांनी केवळ दोन आघाड्यांवर विजयी युद्ध लढले नाही तर ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले तेव्हा युद्धाच्या इतिहासात अतुलनीय अशा कामगिरीची नोंद झाली आहे.
संपूर्ण राष्ट्रात सुरू असलेल्या उत्सवांचा भाग म्हणून, नागरी प्रशासनासह दक्षिण कमांड ०१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पुण्यातील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच महिन्याभराचा उत्सव आयोजित करणार आहे. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी सरहद महाविद्यालय, कात्रज येथे विजय मशालीचे भव्य स्वागत करण्यात आल्यानंतर काल पिंपळे सौदागर येथे मशालीचे स्वागत करण्यात आले.





















Join Our Whatsapp Group