पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आणखी एक प्रशासकीय कारवाई केली आहे. तत्कालीन उपअग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत हिरामण चिपाडे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा आदेश जारी केला आहे. या दुर्घटनेप्रकरणी यापूर्वी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधातही विभागीय चौकशी सुरू आहे.

चिपाडे यांनी प्रशासनिक इमारतीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता आणि मंजूर आराखड्याची पडताळणी न करताच अंतिम अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) दिल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष उभारण्यात आलेले बांधकाम आणि मंजूर आराखड्यात मोठी तफावत असतानाही त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही. या हलगर्जीपणामुळे अनधिकृत अतिरिक्त बांधकामावर वेळेत कारवाई झाली नाही आणि ८ जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत पडल्याने नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला, असा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे.





















Join Our Whatsapp Group