पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगर स्पाईन रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येत्या आठ दिवसांत या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मारूती जाधव यांनी दिला आहे.

मारूती जाधव यांनी म्हटले आहे की, परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही याच स्पाईन रोडवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मारुती जाधव मित्रपरिवाराच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सुमारे ५६० खड्डे असल्याचा दावा केला असून खड्डे दुरुस्तीसाठी गेल्या वर्षभरात सुमारे १५० कोटी खर्च केल्याचे सांगितले आहे. मात्र, रस्त्यांची सद्यस्थिती पाहता हा निधी नेमका कुठे खर्च झाला, याची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी मारुती जाधव यांनी केली आहे.
येत्या आठ दिवसांत कृष्णानगर स्पाईन रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून खड्ड्यांचे ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मारुती जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group