पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील गणेशोत्सवात यंदा एका तरुणाने साकारलेल्या अनोख्या देखाव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मायक्रोबायोलॉजी विषयाचे शिक्षण घेणाऱ्या दर्शन सोनवणे या तरुणाने स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारी हुबेहूब प्रतिकृती साकारून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. हा देखावा सध्या नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

गणेशोत्सवाशी अजितदादा पवार यांचे विशेष नाते होते. दरवर्षी ते शहरातील अनेक गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचे दर्शन घेत असत. त्यांच्या निधनानंतर यंदाचा गणेशोत्सव प्रथमच त्यांच्या अनुपस्थितीत साजरा होत असल्याने अनेक कार्यकर्ते आणि नागरिक भावूक झाले आहेत. हीच भावना जपण्यासाठी दर्शन सोनवणे यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलागुणांतून हा विशेष देखावा उभारला आहे.

विशेष म्हणजे, दर्शन यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून त्यांनी केवळ आपल्या आवडत्या नेत्याबद्दलच्या आदरातून हा उपक्रम हाती घेतला. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसापासून सलग तीन महिने मेहनत घेत त्यांनी बाप्पाचे स्वागत करणाऱ्या अजितदादांची जिवंत भासणारी प्रतिकृती तयार केली. तसेच त्यांच्या निधनाशी संबंधित विमान अपघाताचा प्रसंगही या देखाव्यात संवेदनशीलपणे साकारण्यात आला आहे.
हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, गणेशभक्त आणि युवक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. अनेक जण प्रतिकृतीसोबत छायाचित्रे काढत असून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. दर्शन सोनवणे यांच्या या कलात्मक उपक्रमामुळे गणेशोत्सवात भावनिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या मेहनतीची आणि कलाकृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.



















Join Our Whatsapp Group