पिंपरी (Pclive7.com):- कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने भव्य रक्तदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था, युवक मंडळे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन रमेश भोरकर आणि सुनील मोरे यांनी केले आहे. ही रक्तदान स्पर्धा रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री विठ्ठल मंदिरासमोर, संत तुकाराम महाराज पालखी तळ, आकुर्डी येथे होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा सामाजिक संस्थेच्या सर्वाधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केल्यास त्या मंडळाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, त्यामध्ये एक सायकल आणि एक ग्रॅम सोन्याचे नाणे अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

“रक्तदान हेच खरे मानवतेचे दान” या सामाजिक संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी इखलास सय्यद (मो. 9552345429) यांच्याशी संपर्क साधावा.



















Join Our Whatsapp Group