पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्रभाग क्रमांक १३ मधील राहुलनगर, सेक्टर क्रमांक २२ येथे पाण्याच्या टाकीजवळील उद्यानाच्या जागेत प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापौर आणि आयुक्त यांना निवेदन देऊन सदर प्रस्ताव चार दिवसांत रद्द करण्याची मागणी केली आहे.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित जागा दाट लोकवस्तीमध्ये असून पाण्याच्या टाकीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर महापालिकेची शाळा आहे. या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळेजवळ कचरा प्रक्रिया केंद्र उभारल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
कचरा प्रक्रिया केंद्रामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, धूळ, डास-माशांचा प्रादुर्भाव, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि प्रदूषण यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच पाण्याच्या टाकीजवळ प्रकल्प उभारल्यास पाणीपुरवठा दूषित होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेत कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करून ती जागा नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी कायम ठेवावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच चार दिवसांत निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि नागरिकांच्या हितासाठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शाखाध्यक्ष सागर बहुले, सामाजिक कार्यकर्ते प्रबुद्ध कांबळे हे उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group