१५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलनाचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील वाढत्या कथित भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि महसूल बुडवण्याच्या प्रकारांची स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. तसेच येत्या १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विनोद नढे यांनी प्रशासनाला दिला आहे.

विनोद नढे यांनी दिलेल्या निवेदनात बांधकाम परवानगी विभागातील काही अधिकाऱ्यांवर प्रशमन शुल्क (Compounding Charges) आकारणीत कथित हेराफेरी केल्याप्रकरणी झालेल्या निलंबन कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र, हा प्रकार केवळ हिमनगाचे एक टोक असून विभागात अनेक वर्षांपासून संगनमताने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनानुसार, शहरातील अनेक निवासी व व्यावसायिक प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र (OC) देताना, नकाशे मंजूर करताना तसेच एफएसआय (FSI) आणि विकास शुल्काची गणना करताना नियमबाह्य सवलती देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विकासकांच्या फायद्यासाठी महापालिकेच्या महसुलाचे नुकसान करून काही अधिकाऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

विनोद नढे यांनी नियमबाह्य एफएसआय मंजुरी, आरक्षणांचे उल्लंघन, बनावट कागदपत्रांच्या आधारे टीडीआर (TDR) लोडिंग, मंजूर नकाशांप्रमाणे बांधकाम नसतानाही दिलेली भोगवटा प्रमाणपत्रे, पार्किंग जागांचा अनधिकृत वापर आणि अग्निशमन नियमांचे उल्लंघन या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रकल्पांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय विकासक आणि नागरिकांकडून कथित लाच उकळण्यासाठी फायली मुद्दाम प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रक्रियेचे तांत्रिक आणि डिजिटल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नढे यांनी प्रशासक कालावधीसह मागील तीन ते चार वर्षांत मंजूर झालेल्या सर्व बांधकाम परवानगी फायलींचे स्वतंत्र थर्ड पार्टी टेक्निकल आणि फायनान्शियल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता वरिष्ठ अधिकारी, वास्तुविशारद आणि संबंधित विकासकांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेचे कथितपणे बुडालेले कोट्यवधी रुपयांचे महसुली नुकसान संबंधित विकासक आणि दोषी अधिकाऱ्यांकडून सव्याज वसूल करावे, तसेच येत्या १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विनोद नढे यांनी प्रशासनाला दिला आहे.



















Join Our Whatsapp Group