पिंपरी (Pclive7.com):- बालकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या ‘चाईल्ड फ्रेंडली बस’ उपक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्तालयात उत्साहात पार पडला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली विशेष बाल पोलीस पथक आणि होप फॉर दि चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य शुभांगी तांबट तसेच होप फॉर दि चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. कॅरोलीन उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बालकांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करण्याची गरज व्यक्त केली. बालकांसाठी सुरक्षित, संवेदनशील आणि बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते ‘चाईल्ड फ्रेंडली बस’ला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ही बस पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये फिरून बालहक्क संरक्षण, सुरक्षित बालपण आणि बालकांशी संबंधित विविध विषयांवर जनजागृती करणार आहे.
‘बालस्नेही शहर’ अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजामध्ये बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड (गुन्हे), बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (गुन्हे), गणेश इंगळे (मुख्यालय), धीरज पाटील (विशेष शाखा), सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घार्गे, विशेष बाल पोलीस पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच होप फॉर दि चिल्ड्रेन फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group