पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी परिसरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आणि रस्ते विकासाच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांविरोधात सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. रस्त्यावर रांगोळी काढून त्यांनी रस्ते कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कुदळवाडी परिसरातील नागरिकांना खराब रस्ते, मोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य तसेच अपुऱ्या रस्ते सुविधांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रस्त्यांच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतानाही रस्त्यांची अवस्था सुधारत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मारुती जाधव यांनी सांगितले की, रस्ते विकासासाठी निधी मंजूर होतो, कामेही केली जातात; मात्र काही दिवसांतच रस्ते पुन्हा खराब होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे संबंधित कामांची गुणवत्ता, ठेकेदारांची जबाबदारी आणि खर्च झालेल्या निधीचा तपशील नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाने कुदळवाडी परिसरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. स्थानिक नागरिकांनीही परिसरातील रस्त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


















Join Our Whatsapp Group